Tuesday , February 27 2024
Breaking News

उपमुख्यमंत्री पुत्राच्या कारच्या ठोकरीने १ ठार

Spread the love

बेळगाव : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी यांच्या कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील कुडलसंगम क्रॉसजवळ झाला. अपघातानंतर मृताच्या नातेवाईक आणि स्थानिकांना चिदानंद सवदी यांनी धमकीही देल्याचे समजते.

चित्रदुर्ग-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर कुडलसंगम क्रॉसजवळ झालेल्या या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. कुडलेप्पा मोळी (वय ५८) रा. चिक्कहंडरगल, ता. बागलकोट असे मृताचे नाव आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला बागलकोटच्या खासगी इस्पितळात दाखल केले होते. मात्र उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. मृत कुडलेप्पा काल सायंकाळी शेतातून घरी परतताना हा अपघात झाला. मंत्रिपुत्र चिदानंद यांची एमजी गोल्डस्टार कंपनीची केए २२-एमसी ५१५१ क्रमांकाची ही मोटर विजापूरकडे चालली होती. अपघातानंतर जखमीला इस्पितळात नेण्याऐवजी आपल्या कारच्या नंबरप्लेटची मोडतोड करून कागदपत्रे घेऊन दुसऱ्या वाहनातून जाण्याच्या तयारीत चिदानंद सवदी होते. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडून ठेवत तेथेच बसवून ठेवले. यावेळी चिदानंद यांनी मी उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे अशी धमकी दिल्याचेही समजते. चिदानंद हे स्वतःच कार चालवत होते असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

चिदानंद आपल्या १२ मित्रांसमवेत हंपी, होस्पेट, कोप्पळ, अंजनाद्री बेट्टासह राज्यातील विविध ठिकाणी २ गाड्यामधून फिरायला गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, या अपघातामुळे मला दुःख झाले आहे. अपघातग्रस्त कारमध्ये माझा मुलगा चिदानंद नव्हता. खरे सांगायचे तर माझ्या मुलाला कार चालवताही येत नाही. मंत्र्यांचा मुलगा म्हणून हा विषय उगाच वाढवण्यात येत आहे. दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या माझ्या मुलाने जखमीला इस्पितळात दाखल केले आहे. मीच उद्या मृताच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. त्यांच्या समवेत आम्ही आहोत.

दरम्यान, अथणी येथे पत्रकारांशी बोलताना चिदानंद सवदी यांनी, अपघातस्थळी स्थानिकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. अपघात झाला त्या कारमध्ये मी बसलो नव्हतो, मोटारसायकलस्वार अचानक आडवा आल्याने हा अपघात झाला. चालकाने कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. मृताच्या कुटुंबियांना साह्य करण्यासाठी मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

चिदानंद सोडून चालक हनुमंतसिंग नामक एकाच्या नावाने हुनगुंद पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. एकंदर एका जबाबदार उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने सामान्यांच्या जीवाशी असा खेळ करणे कितपत योग्य आहे असा सवाल केला जात आहे. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असो. सरचिटणीस पदी सुनील जाधव अविरोध

Spread the love  बेळगाव :बेळगाव डिस्ट्रिक्ट डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असोसिएशनच्या सरचिटणीस पदी सुनील विजयानंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *