बेळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संक्रमित नागरिकांवर उपचार करण्यासाठी परिवहन मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत बस रूग्णवाहिका, महिला शौचालय आणि बालदेखभाल युनिटसह अत्याधुनिक यंत्रणायुक्त असलेल्या परिवहनच्या विशेष बससेवेचे आज मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. आज बेळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी फीत कापून अधिकृतरीत्या ही सेवा कार्यान्वित केली.
परिवहनच्या बऱ्याच बसेसचे रूग्णवाहिकेत रूपांतर करून त्या कोविड सेवेसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महिला शौचालय आणि बालदेखभाल युनिटचा समावेश आहे. प्रत्येक बसमध्ये दोन सामान्य तर दोन आधुनिक पद्धतीची प्रसाधनगृहे आहेत. रूग्णवाहिकेत रूग्णांच्या ऑक्सिजनसह सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचे परिवहन एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक किरणकुमार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
या लोकार्पण कार्यक्रमाला गृहमंत्री बसवराज बोम्माई, परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, आमदार अनिल बेनके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.