येळ्ळूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना सदृश्य परिस्थिती त्यातच उद्योगधंदे बंद, इतर व्यवसायही बंद आहेत, शेतीमध्ये सुद्धा अपुरा रोजगार उपलब्ध असल्यामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत अशादिप सोशल वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्ज्वला कुगजी तसेच सदस्य परशराम खेमणाकर यांनी येळ्ळूरमधील सुमारे 78 गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. आशादिप फाउंडेशनतर्फे नेहमीच गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करण्यात येत असते, बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून गरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्याचे काम गेल्या चार वर्षापासून अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्ज्वला कुगजी करीत आहेत. खानापूरसारख्या दुर्गम भागातील गरीब व गरजूंना सुद्धा त्यांनी अनेक वेळा मोफत अन्नधान्याचे कीट, कपडे, ब्लॅंकेट, तसेच जीवनावश्यक वस्तू यांचेही वितरण केले आहे. येळ्ळूरमध्ये असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांचा सर्वे करून त्यांनी गावातील सुमारे 78 कुटुंबांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले. या किटमध्ये 7 किलो तांदूळ, 5 किलो गहू, दोन किलो तूर डाळ, दोन किलो मुगडाळ, एक किलो गूळ, 200 ग्रॅम तिखट, यासह इतर साहित्य देण्यात आले. येळ्ळूरमधील परमेश्वर नगर, ब्रह्मलिंग मंदिर चांगळेश्वरी मंदिर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः हणमंत कुगजी यांनी जाऊन व त्या-त्या परिसरातील ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन या किटचे वाटप केले. यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुधापा बागेवाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले, आशादिपचे सदस्य हणमंत कुगजी, परशराम खेमनाकर, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, प्रमोद पाटील, रमेश मेणसे, राकेश परीट, येळ्ळूर विभाग समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, सतीश देसुरकर, जयसिंग राजपूत, सुरज गोराल, तानाजी पाटील, शिवाजी कदम आदी यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम चांगळेश्वरी मंदिर येथे घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष सतीश पाटील, दुद्धाप्पा बागेवाडी व राजू पावले यांनी हणमंत कुगजी यांच्या या कार्याचे कौतुक करत त्यांचा त्यांच्या पत्नी उज्ज्वला कूगजी यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी हणमंत कुगजी म्हणाले हे कार्य आम्ही सतत यापुढेही चालूच ठेवू अशी ग्वाही दिली.