बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार वर्गाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने असंघटीत कामगारांना मदत जाहीर केली आहे ही मदत थेट कामगारांना मिळावी. सदर मदत वाटपात कोणत्याही एजंटचा हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना वजा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संबधित
अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी सकाळी कामगार संघटनेचे नेते, कामगार खात्याचे अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सदर सूचना केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामागरांच्या विविध 11 संघटीत गटांना सरकारने मदत जाहीर केली आहे. यामध्ये घरगुती कामगार, धोबी, न्हावी, हमाल, टेलर, कुंभार, लोहार, अशांना शासनाने मदत जाहीर केली आहे.
या कामगारांना प्रतिमहा 2000 रु. ची मदत सरकारने जाहीर केली आहे ही मदत कामगार खात्याकडून संबधित कामागरांपर्यंत पोचवली जावी. यामध्ये इतर कोणाही मध्यस्थितीचा हस्तक्षेप नको तसे झाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला.
बांधकाम क्षेत्रातील कामगारांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्या कामगारांना प्रत्येकी 3000 रु. ची मदत देण्यात येणार आहे. ही मदत संबंधितांपर्यंत विना हस्तक्षेप पोचवण्यात यावी असे जिल्हाधिकारी म्हणाले. त्याचबरोबर असंघटीत कामागरांपर्यंत सरकारची मदत पोचविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.