बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘इन न्यूज’च्या ‘आपली मराठी’च्या उपसंपादक आणि युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र बेळगाव जिल्हा शाखेच्या प्रवक्त्या निलीमा लोहार यांनी आपल्या जन्मदिनानिमीत्त अवयव आणि देहदानाचा संकल्प केला आहे. गुरुवारी या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली.
कोविड नियमांचे पालन करत झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केएलई संस्थेच्या श्री बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान, केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या नेत्रपेढीला नेत्र, त्वचापेढीला त्वचा आणि बेंगळूरच्या जीवन सार्थक संस्थेला अवयव दान करण्याबाबतची कागदपत्रे कंकणवाडी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाचे शरीरशास्त्र विभाग प्रमुख व रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. महांतेश रामण्णावर यांच्याकडे निलीमा लोहार यांनी सुपूर्द केली. डॉ. रामण्णावर यांचे वडील डॉ. बी. एस. रामण्णावर यांनी मरणोत्तर देहदान केले होते. त्यापासून प्रेरणा घेत निलीमा लोहार यांनीही देहदानाचा संकल्प केल्याचे सांगितले.
यावेळी माजी महापौर विजय मोरे, ‘इन न्यूज’चे प्रधान संपादक राजशेखर पाटील, ऍलन मोरे, आर्यन नलावडे आदी उपस्थित होते. एकंदर, आपल्या वाढदिवसानिमित्त पत्रकार निलीमा लोहार यांनी देहदानाचा संकल्प करून समाजापुढे आदर्श ठेवत इतरांसाठी प्रेरणादायक पाऊल उचलले आहे हे निश्चीत !