बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी दूषित होत आहे. परिणाम जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याबरोबरच या भागात पाण्याचे दुर्भिक्ष भासू लागले असून प्रशासनाने ड्रेनेज मिश्रित पाण्याची गंभीर समस्या त्वरेने निकालात काढावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
रयत गल्ली, वडगाव येथील 1936 साली बांधलेली विहिर परिसरातील नागरिकांना वरदान आहे. मागे बेळगावमधील अनेक विहिरी मुजवल्या तशीच ही विहिरही रस्त्यात येते म्हणून बुजवायचे प्रयत्न झाले. तथापी गल्लीतील तसेच इतर जागरूक नागरिकांनी भविष्यातील पाणीटंचाईची जाणीव करून देऊन त्याला विरोध केला. झाले ही तसेच कालांतराने बेळगावमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली.
त्यामुळे महापालिकेने मुजवलेल्या अनेक विहिरी पुन्हा वापरात आणण्यास सुरुवात केली. पूर्वी 1936 साली येळ्ळूर तालूका लोकल बोर्ड माध्यमातून तत्कालीन ज्येष्ठ शेतकऱ्यांनी रयत गल्लीतील विहिर काढल्यानंतर तिच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी वापर होत होता. मात्र शहरात नळ पाणी योजना येताच या ब्रिटिशकालीन विहिरीकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. पाणीटंचाईच्या काळात नळाचे पाणी अपूरे पडत असल्याने पुन्हा या विहिरीचे महत्त्व वाढले. गल्लीतील नागरिकांसह असंख्य जनावरं या विहिरीवर अवलंबून राहू लागली. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन महापौर दिवंगत संभाजी पाटील यांनी विहिरीवर जलशुध्दीकरण बसवून तिचे पाणी रयत गल्ली व परिसरात पोहोचवून सर्वांना दिलासा दिला.
स्मार्ट सिटीच्या बाता मारणाऱ्या बेळगाव प्रशासनाचे जनतेच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून याचे उदाहरण म्हणजे रयत गल्लीतील ही विहीर होय. सध्या विहिरीतच नव्हे तर आजूबाजूच्या बोअरवेलना देखील ड्रेनेजचे सांडपाणी मिश्रित दुषीत पाणी येऊ लागले आहे. पाण्याला उग्र दुर्गंधी येत असल्यामुळे जनावरे देखील त्याला तोंड लावावे अशी झाली आहेत.
याबाबत मध्यंतरी एल अँड टी कंपनीकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी विहिरीची स्वच्छता करून तिच्या पाण्यात जंतुनाशक ब्लिचिंग पावडर टाकली होती. हा प्रकार दोन वेळा करून देखील विहिरीचे पाणी दूषितच राहत आहे. ड्रेनेज पाईपलाईनला कुठूनतरी गळती लागून जमिनीत झिरपणारे ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी विहिरीत व बोअरवेलनां येत आहे. त्यामुळे गल्लीतील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वी रयत गल्लीतील हॅन्डपंप असलेल्या बोअरला असेच दूषित पाणी आल्याने ती सध्या बंद पडली आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष भासत आहे. तेंव्हा या भागाचे लोकप्रतिनिधी आणि महापालिकेने या पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रयत गल्लीतील ड्रेनेज मिश्रित पाण्याची गंभीर समस्या तात्काळ निकालात काढावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta