Friday , March 13 2026
Breaking News

बेळगाव महानगरपालिकेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने कुमार गंधर्व कला मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. समाजात बदल घडवण्यासाठी महिलांचे योगदान हाच पाया असून, या बदलाची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सभागृह नेते हनुमंत कोंगाली, माजी महापौर सविता कांबळे, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., उपायुक्त उदयकुमार तळवार, सिद्धू हुल्लोळी, अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर आणि स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत पार पडले. उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याच कार्यक्रमात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या आणि विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच केएएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सुमीत मोटेकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. बसवण्णा यांच्या काळापासूनच महिलांना समाजात उच्च स्थान देण्यात आले असून, घर आणि समाज सुधारण्याची खरी ताकद महिलांमध्येच आहे, असे हनुमंत कोंगाली यांनी म्हटले. सर्वच क्षेत्रांत महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळवून द्यायचे असेल, तर त्यांनी आपली क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. भारतीय महिलांनी जिद्द धरली, तर त्या अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतात. स्वच्छ भारत अभियानात महिलांची भूमिका महत्त्वाची असून, महिलांनी पालिकेला सहकार्य केल्यास स्वच्छ बेळगाव योजना यशस्वी होईल, अशी प्रतिक्रिया जगदीश हिरेमणी यांनी दिली.

महिलांशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे यश हे महिलांच्या कर्तृत्वाचा पुरावा आहे. पूर्वी कौटुंबिक आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे महिलांना प्रगती करण्यात अडथळे येत होते, मात्र आता काळ बदलला आहे. महिलांसमोरील आव्हाने दूर करून त्यांना प्रगतीची संधी आपल्या घरापासूनच उपलब्ध करून द्यायला हवी, असे महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी म्हटले. या प्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

माध्यमिक विद्यालय, कर्ले येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ, पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

Spread the love  बेळगाव : विश्व भारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय, कर्ले येथील 2025-2026 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *