
बेळगाव : बेळगावमध्ये आज दुपारी आलेल्या मुसळधार वळिवामुळे वीरभद्र नगर आणि खुस्रो नगरमध्ये पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. रमजान सणानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले २० पेक्षा जास्त स्टॉल्स वादळाच्या वेगामुळे कोसळले असून, यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास व्यापारी सणानिमित्त ग्राहकांसाठी खाद्यपदार्थ तयार करत असतानाच अचानक पावसाने जोर धरला. जोरदार वाऱ्यामुळे दुकानांवरील छप्परे उडून गेली असून विक्रीसाठी साठवून ठेवलेले अन्नपदार्थ आणि इतर वस्तू पावसात भिजून खराब झाल्या आहेत. संपूर्ण रस्ते जलमय झाले असून गटारांचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वर्षभर ज्या सणाची प्रतीक्षा होती, त्याच वेळी असे संकट आल्याने गरीब व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांना मदत केली. कोसळलेली दुकाने सावरण्यासाठी आणि पावसाच्या पाण्यात अडकलेल्या वस्तू सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. या भीषण वादळ आणि पावसात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, सणाच्या उत्साहात पावसाने दिलेल्या या धक्क्यामुळे वीरभद्र नगरमधील व्यापारी हवालदिल झाले असून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कणबर्गी परिसरातही मुसळधार पावसामुळे घरांमध्ये आणि बस निवाऱ्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta