Tuesday , March 17 2026
Breaking News

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रॉपर्टी परेडद्वारे चोरीच्या मालाचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ६ कोटी ३६ लाख ९३ हजार ७४३ रुपये किमतीचा मुद्देमाल ‘प्रॉपर्टी परेड’द्वारे मूळ मालकांना हस्तांतरित केला.

पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात तक्रारदारांना त्यांचा चोरीला गेलेला ऐवज सन्मानपूर्वक परत करण्यात आला. २०२५ मध्ये शहरातील विविध भागांत झालेल्या घरफोडी, साखळी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला होता. यामध्ये २ कोटी ३६ लाख रुपये किमतीचे सुमारे २ किलो ३३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४ कोटी रुपये किमतीची ८५ वाहने, ज्यात जड ट्रक आणि कारचा समावेश आहे, त्यांचा समावेश आहे. तसेच सीआयआर पोर्टलच्या माध्यमातून शोधलेले १४० मोबाईलही यावेळी मालकांना देण्यात आले.

पोलीस दलाने तांत्रिक तपासाच्या आधारे चोरांच्या मुसक्या आवळून हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो नागरिकांना परत दिला जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

यावेळी चोरीला गेलेले १४५ ग्रॅमपैकी ११५ ग्रॅम सोने आणि दुचाकी परत मिळाल्याबद्दल शांतीनगर येथील डॉ. एम. ए. मरळी यांनी पोलिसांचे आभार मानले. वैभव नगरमधील गणेश मंदिरातील पूजेचे चोरीला गेलेले साहित्य परत मिळाल्याबद्दल पुजारी सिद्धलिंगय्या हिरेमठ यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सुळेभावी येथील गीता दुधगी यांनीही त्यांचे चोरीला गेलेले ६ तोळे सोने पोलिसांनी शोधून दिल्याबद्दल पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या यशस्वी तपास प्रक्रियेत पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत निष्ठापूर्वक काम केले. शहापूर, खडेबाजार, टिळकवाडी आणि इतर ठाण्यांच्या या कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्तांनी संबंधित पथकांचे विशेष कौतुक केले असून, भविष्यातही नागरिकांनी तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वादळी वाऱ्यासह गारपीट; रमजानच्या बाजारपेठेचे मोठे नुकसान

Spread the love  बेळगाव : बेळगावमध्ये आज दुपारी आलेल्या मुसळधार वळिवामुळे वीरभद्र नगर आणि खुस्रो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *