
बेळगाव : बेळगावमधील शाहूनगर भागात अनधिकृत इमारत पाडण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला शेवटच्या क्षणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे मोठा धक्का बसला. यामुळे सुरू झालेली पाडकामाची कारवाई अर्धवट थांबवावी लागली असून महापालिका अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
शाहूनगरमधील जाधव नावाच्या व्यक्तीची इमारत गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर वादात अडकली होती. महापालिकेच्या नियमानुसार, या इमारतीने ८० फूट रुंदीच्या नियोजित रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर अलीकडेच न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता.
न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका अधिकारी बुलडोझरसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाडकामाला सुरुवात केली. यावेळी इमारतीचे मालक आणि अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. “आम्ही सीडीपी प्लॅननुसार ६० फूट रस्त्यासाठी जागा सोडून बांधकाम केले आहे, मात्र आता पालिका ८० फूट रस्त्याचा दावा करत आहे,” असा संताप जाधव यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. जेसीबीने इमारतीचा काही भाग पाडण्यास सुरुवात केली असतानाच, जाधव यांच्या वकिलांनी घटनास्थळी धाव घेतली आणि न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवल्याची कागदपत्रे सादर केली. या अनपेक्षित वळणामुळे कायदेशीररित्या कारवाई पुढे नेणे अशक्य झाल्याने अधिकाऱ्यांनी काम थांबवले. या परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta