Wednesday , March 18 2026
Breaking News

बेळगावात बनावट नोटा खपवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Spread the love

 


५०० रुपयांच्या ४९५ नोटा आणि स्विफ्ट कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : बेळगावमध्ये आंतरराज्य बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील चार आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे. जेएमएफसी न्यायालयाने या चारही आरोपींना २७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अटक झालेल्यांची नावे मोहम्मद हसुवा, बक्षी श्रवणकुमार, अरबाज उर्फ रुपेश मोहम्मद वाठोड आणि टुनटुन उर्फ आदिल अशी आहेत. हे सर्व आरोपी मूळचे गोवा आणि बिहार राज्यातील रहिवासी असून सध्या गोव्यात वास्तव्यास होते.

दिनांक १६ मार्च २०२६ रोजी बेळगावमधील खडेबाजार रोडवरील एका दुकानदाराने पोलीसांना माहिती दिली की, चार व्यक्ती दुकानात सामान खरेदीसाठी आले असून त्यांनी दिलेल्या ५०० रुपयांच्या नोटांमध्ये बनावट असल्याचा संशय आहे. याप्रकारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस निरीक्षक जे. एम. कालमिर्ची, पीएसआय हुसेनसाब केरूर आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली.

पोलीस पथकाने जुन्या पीबी रोडवरील बाण मार्केटजवळ एका स्विफ्ट कारमधून चारही आरोपींना रंगेहात पकडले. आरोपींकडून ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या ४९५ बनावट नोटा, चार मोबाईल संच आणि ३ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणात आणखी दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मार्केट पोलीस आणि पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वादळी वाऱ्यासह गारपीट; रमजानच्या बाजारपेठेचे मोठे नुकसान

Spread the love  बेळगाव : बेळगावमध्ये आज दुपारी आलेल्या मुसळधार वळिवामुळे वीरभद्र नगर आणि खुस्रो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *