
बिदर : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बोंथी, तालुका औराद, जिल्हा बिदर रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड हे होते. बैठकीचे प्रस्ताविक पृथ्वीराज पाटील यांनी केले.
बैठकीच्या सुरुवातीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी, कै. अशोक मुळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला.
बैठकीदरम्यान प्रदीर्घकाळ सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या दाव्याची सलग सुनावणी घेण्यासंदर्भात बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने एक लाख सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेस बिदर, भालकी या भागातून पाठिंबा व्यक्त करत जास्तीत जास्त सह्या घेऊन ही मोहीम यशस्वी करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
बैठकीला समितीचे उपाध्यक्ष नारायण पाटील, सहकार्यवाह डॉक्टर संजय मुळे, खजिनदार ॲड. भास्कर कुलकर्णी, सदस्य राजकुमार पाटील, पंढरीनाथ पाटील, उत्तम पाटील, प्रा. दिलीप पाटील, विठ्ठलराव पाटील, रामराव रावणगावे, कालिदास पाटील, भगवान खोंडे, जीवनराव शिंदे, बब्रूवाण जाधव, ॲड. रमेश बिरादार, विठ्ठलराव बागदे, सतीश वासरे, चंदरराव बाकले, नारायण पाटील (कोरेकल) आदी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन प्रा. देविदास पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta