
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव या संस्थांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. “मेंदूच्या विकासाचे टप्पे आणि मुलांचे शिक्षण” या विषयावर प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. पानसे यांनी आपल्या सखोल अभ्यासाच्या आधारे मुलांच्या मेंदूच्या विकासातील विविध टप्प्यांचे महत्त्व स्पष्ट केले. लहान वयात मुलांचा मेंदू अत्यंत वेगाने विकसित होत असल्याने त्या काळात योग्य वातावरण, अनुभव आणि शिकण्याच्या संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीऐवजी कृतीआधारित, अनुभवाधारित आणि आनंददायी शिक्षण पद्धती अवलंबणे गरजेचे आहे. शिक्षकांनी मुलांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाकडे समतोलपणे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यशाळेदरम्यान विविध उपक्रम, उदाहरणे आणि प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून विषय अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आला. उपस्थितांनीही विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी नीला आपटे यांनी आभार मानले. या कार्यशाळेमुळे शिक्षक आणि पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले असून, शिक्षणाच्या गुणवत्तेत निश्चितच सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गौरी ओऊळकर, नीला आपटे, सविता पवार, बी. जी. पाटील यांनी परिश्रम घेतले. साठे मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर, सचिव श्री. सुभाष ओऊळकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta