बेळगाव : चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल एसी ऑफिस हे आम्ही किंवा तुम्ही निर्माण केले नाही. यापूर्वी ब्रिटिशांनी तिन्ही बाजूला एसी ऑफिसची निर्मिती केली आहे. याचप्रकारे चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल अशा तीन जिल्ह्यांचे विभाजन व्हावे, यासाठी पुढाकार घेणारच असे उमेश कत्ती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा असून या जिल्ह्याचा विकास करायचा असल्यास जिल्ह्याचे तीन विभागात विभाजन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात राजकीय मतभेद न बाळगता काँग्रेस, भाजपने एकत्रित येऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात बागलकोटचे नाव घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बागलकोटमध्ये एसी कार्यालय आहे. हे कार्यालय आपण स्थापन केले नसून यापूर्वी असलेल्या ब्रिटिश सरकारने केले आहे. आपण राज्यातील जबाबदार मंत्री असून माझे युक्तिवाद हे सर्वांसमोर मांडण्याचा आग्रह करण्यात आला आहे. सरकार यासंदर्भात अंतिम निर्णय घेईल, असे उमेश कत्ती म्हणाले.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी आपण पुढाकार घेणार असून 18 विभागांचे धारवाडसह तीन जिल्ह्यात विभाजन करण्यात आले आहे. याचप्रमाणे बेळगावचेही विभाजन होणे गरजेचे आहे. 20 वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व या जिल्ह्यात अधिक असल्याने हे विभाजन झाले नाही, असेही शेवटी उमेश कत्ती म्हणाले.
