बेळगाव : आपल्या पतीचा मृत्यू हि आत्महत्या नसून हा खून असल्याचे सांगत मंत्री के. ईश्वरप्पा यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी मृत संतोष पाटील यांची पत्नी जयश्री पाटील यांनी केली आहे. डेथ नोट लिहून उडुपी येथील लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या बेळगावच्या संतोष पाटील यांच्या मृत्यूला मंत्री के. ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अवघ्या दोन वर्षांच्या लहान मुलाला घेऊन आता पुढील जीवन कसे काढायचे असा केविलवाणा प्रश्न संतोष पाटील यांची पत्नी उपस्थित करत आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना आपली केविलवाणी प्रतिक्रिया देताना जयश्री पाटील यांनी सांगितले कि, आपल्या पतीकडे मंत्री के. ईश्वरप्पा यांनी कमिशन मागितले होते. ४ कोटी रुपयांच्या कामकाजातील ४० टक्के कमिशन देण्याची मागणी त्यांनी आपल्या पतीकडे केली होती. ४० टक्के कमिशन दिल्यास आपण तोट्यात येऊ असे माझ्या पतीने सांगितले. हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सोन्या चांदीचे दागिने घाण ठेवून पैसे उभे केले. आत्महत्या करण्यापूर्वी सायंकाळी त्यांनी आपल्याशी उत्तमरीत्या चर्चाही केली. नेटवर्क येत नसून सायंकाळी आपण संपर्क साधू असेही आपल्या पतीने सांगितले. मात्र सकाळी पोलिसांनी फोन केल्यानंतर फोन न उचलल्याने आपल्याला हा संपूर्ण विषय समजला असे त्या म्हणाल्या. संतोष पाटील यांनी आपल्या गावी एक घरकुल देखील उभे केले. घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या संतोष पाटील यांनी आपल्या घराचे नाव देखील कन्नडमध्ये ‘कनसु’ म्हणजेच मराठीतील स्वप्न असे ठेवले होते. मात्र त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले, अशी खंत संतोष पाटील यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपल्यासहीत आपला मुलगा अनाथ झाला आहे, याला ईश्वरप्पा जबाबदार आहेत, असा आरोप जयश्री पाटील यांनी केलाय.
संतोष पाटील यांच्या पत्नीसह त्यांच्या आईलाही दुःख अनावर झाले असून आपल्या मुलाच्या मृत्यूला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. गुरुवारीच आपण आपल्या मुलाशी संपर्क केला होता. यावेळी आपण बिल घेण्यासाठी आलो असून बिल घेऊन परत येईन असे माझ्या मुलाने सांगितले. मात्र तो परत आलाच नाही असे म्हणत संतोष पाटील यांच्या आईने आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
Check Also
ममता चिठ्ठीचे मरणोत्तर देहदान
Spread the love जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार बेळगाव : मूळच्या येळ्ळूर आणि सध्या समृद्धी कॉलनी …