बेळगाव (वार्ता) : वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी चंद्रशेखर निलगार हे गेल्या 31 जुलै रोजी 31 वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कलघटगी हे होते.
उपस्थितांचे स्वागत करून सहकार्यवाह संतोष होंगल यांनी नीलगार यांच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन निलगार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना नीलगार यांनी ‘आपण गोगटे कॉलेजचे विद्यार्थी होतो आणि कॉलेज समोर उभारलेल्या स्वातंत्र्यसैनिक भवनात माझा सत्कार होतोय याचा अभिमान वाटतो’ असे उद्गार काढले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक गृहनिर्माण संघटनेचे अध्यक्ष संतोष भेंडीगिरी यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी संघटनेचे दिलीप सोहनी, हिरालाल चव्हाण याचबरोबर अनंत लाड, वैभव खाडे, पी. जे. घाडी, किरण बेकवाड, विवेकानंद पोटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
