Friday , October 18 2024
Breaking News

वाचन लेखनाचे संस्कार विद्यार्थ्यांसह समाजात बिंबवणे गरजेचे : प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील

Spread the love

द. म. शिक्षण मंडळ , बी. के, ज्योती, बीबीए, बीसीए, जेसीए महाविद्यालयाचा पाठिंबा

बेळगाव : मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ही प्रत्येक आपलीच मक्तेदारी नसून देशातील प्रत्येकाने मराठी भाषा मराठी अस्मिता जपायला हवी हे गव प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीटपणे सांभाळायला हवे आहे. भारतात विविधता आहे त्यामुळे अनेक भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषांचा आदर आणि गौरव करायला आपण शिकले पाहिजे. कोणत्याही भाषेचा द्वेष न करता आपण कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे ते प्रत्येकाने जबाबदारी पेलायला हवी. भाषा ही आपल्या सर्व विचारांची एक वेगळी ताकत आहे ती आपण ओळखणं अत्यंत गरजेचे आहे. आपली मातृभाषा मराठी आहे हे आपण अभिमानाने सांगून ती जतन करायला हवी.

माणसाला निसर्गाकडून ज्या गोष्टी मिळतात, त्यावर माणूस आपल्या सृजनशीलतेच्या सहाय्याने प्रक्रिया, संस्कार करतो. या संस्कारांमधून निर्माण होणारे विचार, चालीरीती, पद्धती म्हणजेच माणसाची संस्कृती. प्रत्‍येक व्‍यक्‍तीची संस्‍कृती ही दुसर्‍या व्‍यक्‍तीच्‍या संस्‍कृतीहून काही प्रमाणात का होईना वेगळी आणि स्‍वतंत्र असते. संस्कृती ही अनेक वर्षांच्या प्रक्रियेनंतर तयार होते. त्यामुळे समान भूभाग, निसर्ग असलेल्या व्यक्तींची संस्कृती सारखी असते. माणसाच्या भावविश्वाचा पाया असते ती संस्कृती. आणि या संस्कृतीला पाया असतो तो म्हणजे साहित्य आणि कला आविष्कार.

समाजात असलेल्या कला, साहित्य, चित्रपट किंवा कोणतेही इतर कला प्रकार घ्या; ते माणसाच्या भावविश्वाचा आरसा असतात. हे कलाप्रकार समाजाचं मन तयार करतात, प्रेरणा जागृत ठेवतात. समाजाचे संस्कार आणि शहाणपण तपासत राहतात. आपला मराठी समाज जर सर्जनशील आणि विवेकी घडावा असं वाटत असेल तर विविध कला आणि साहित्य यांकडे विशेष लक्ष पुरवणे आपल्याला गरजेचे आहे. हे काम केवळ सरकारी अनुदान देऊन होणारे नाही. हा विचार प्रत्येक मराठी मनामध्ये रुजायला हवा. तरच आपण विवेकी समाजाकडे वाटचाल करू शकू.या विषयाकडे बघताना अनेक साहित्य आणि कला प्रकार डोळ्यासमोर येतात. यामध्ये साहित्य, नाटक, चित्रपट, नृत्य, संगीत, शिल्पकला आणि इतर लोककलांचा समावेश होतो. मराठी साहित्य म्हणजे मराठी कथा, कादंबरी, काव्य आणि कविता. १८५७ साली बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली ‘यमुनापर्यटन’ ही मराठीतलीच नव्हे तर भारतातली सर्वात पाहिली कादंबरी समजली जाते. या कादंबरीमध्ये तत्कालीन विधवांच्या प्रश्नावर भाष्य केले आहे. पहिल्याच कादंबरीपासून मराठी साहित्यामध्ये कृतीप्रधानता दिसते. बाबा पद्मनजी नंतर हरी नारायण आपटे, वामन मल्हार जोशी, साने गुरुजी, विभावरी शिरुरकर, भाऊ पाध्ये, अनंत कदम, दिनानाथ मनोहर इत्यादी लेखकांनी ही परंपरा पुढे समर्थपणे चालवली आणि समृद्ध केली.

नंतरच्या काळात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे या लेखकांबद्दल मराठी वाचकांना वेगळे सांगायची गरजही नाही. यानंतर भालचंद्र नेमाडे यांनी बदलत्या समाजाचं चित्र रेखाटायला सुरवात केली. १९८० नंतर गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे यांच्या कादंबऱ्यांमधून बदलत्या स्त्रीजीवनाचे चित्रण केलेले दिसते. जागरुकतेबरोबरच नवीन लेखकांना, कवींना, साहित्यकारांना, कलाकारांना नवीन साहित्य आणि कलेच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. शासन व्यवस्थेने कलाकारांना कलानिर्मितीसाठी अवकाश उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला निकेतने, कलेच्या शिक्षणासाठी संस्था आणि त्यामध्ये चिकित्सकांना ही वाव दिला पाहिजे. यासाठी शासन सुरवातीला मदत करेल, पण त्यानंतर कला चिकित्सकांनी, रसिकांनी हा प्रयोग पुढे नेला पाहिजे, असे प्रतिपादन भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि भाऊराव काकतकर महाविद्यालय, ज्योती पदवीपूर्व महाविद्यालय, बीसीए व बीबीए, जेसीए महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी ज्योती कॉलेज येथील जिमखाना सभाग्रहात 23 व 24 एप्रिल रोजी होणाऱ्या प्रगतिशील लेखक संघाचे पहिले मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते.

प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ज्योती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, बीसीए कॉलेजचे प्राचार्य आनंद पाटील, जेसीए महाविद्यालयाचे प्राचार्य अमित सुब्रमण्यम, प्रा. एस. एस. पाटील, प्रा.व्ही. वाय. पाटील, प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे , प्रा. डॉ. डी. टी. पाटील, प्रा. निलेश शिंदे उपस्थित होते.

स्वागत प्रा. नितीन घोरपडे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य आनंद पाटील यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. आर. डी. शेलार, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. बी. आय. उसुलकर, प्रा. निलेश शिंदे यांनी विचार मांडले.

सूत्रसंचालन प्रा. आर. एल. कावळेकर यांनी केले. प्रा. डॉ. एम. एस. पाटील यांनी आभार मानले.

यावेळी प्रा. डी. ए. निंबाळकर, प्रा. एस. व्ही. पाटील, प्रा. संजय बंड, प्रा. एम. एस. बागी, प्रा. डी. एन. सावंत, मनोज मोरे, प्रा. एन. ए. जाधव, प्रा. सी. जी. बिरादार, प्रा. वाय. एस.केसरकर, प्रा. ए. एस. कुलकर्णी, महादेव पाटील, तसेच सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट लावा कृपया सर 🙏🙏

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *