बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटी संचालित विश्वनाथराव देशपांडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (व्हीडीआयटी) स्थापना दिन 11 मे रोजी दुपारी 3 वाजता संस्थेच्या आवारात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. करिसिद्धाप्पा तर निमंत्रित म्हणून सोसायटीचे विश्वस्त आर. व्ही. देशपांडे, व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. ए. एस. देशपांडे, डॉ. बी. ई. रंगास्वामी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष आनंद मंडगी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना व्हीडीआयटीचे चेअरमन विनायक लोकूर यांनी सांगितले की, 2004मध्ये व्हिडीआयटीची स्थापना झाली. 28 एकर परिसरात कॉलेजसह दोन वसतिगृहे असून आज 1600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्थापनादिनानिमित्त सिव्हिल इंजिनिअरिंग ब्लॉक, बास्केट बॉल कोर्ट, सेमिनार हॉल व औषधी वनस्पतींची नर्सरी यांचे उद्घाटन होणार आहे.
या कॉलेजमध्ये हल्याळसह कारवार, दांडेली, धारवाड आणि अन्य शहरांतील मुले शिकण्यास येतात. लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता व आंतरशाखांचा हा अभ्यासक्रम सुरू करत असून नूतन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम शिकविला जात आहे. याप्रसंगी व्हीडीआयटीचे सचिव एस. व्ही. गणाचारी, सदस्य आर. एस. मुतालिक, प्राचार्य डॉ. वादीराज कुलकर्णी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta