बेळगाव : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून यशस्विनी उद्योजक संस्थेतर्फे आज ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांचा सत्कार करण्यात आला.
यशस्विनी उद्योजक संस्थेचे अध्यक्ष कुमार कोटूर यांच्या अध्यक्षतेखाली याळगी यांच्या निवासस्थानीच हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आल्यानंतर कुमार कोटूर यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवुन गौरविण्यात आले.
स्वातंत्र्य लढ्यात बेळगाव जिल्ह्याचे मोठे योगदान होते. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार सहन करून आपल्या कुटुंबाची पर्वा न करता स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ध्येय बाळगले होते. याळगी कुटुंबाने स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले होते. आमच्या कुटुंबातील बहुतेकांनी स्वातंत्र्य लढ्यात कारावास भोगला होता. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या बर्याच जणांची कागदोपत्री नोंद नाही, पण त्यांचेही लढ्यात योगदान तितकेच महत्वाचे आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य मिळण्यासाठी योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण करणे आवश्यक आहे, असे स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
सदर कार्यक्रमास यशस्विनी उद्योजक संस्थेच्या उपाध्यक्षा शिल्पा केकरे, शीतल मुंदडा, मिलन पवार आदींसह याळगी कुटुंबीय उपस्थित होते.
Check Also
बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Spread the love पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण …