ऐनापूर येथे कब्बड्डी स्पर्धेचे उद्घाटन
उगार खुर्द : फक्त शहरी भागातून नव्हे तर खेड्यातूनही भविष्यात राष्ट्रीयस्तरावरचे खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या खेळाला प्राधान्य देऊन त्यामध्ये आपले करिअर घडवा, असे आवाहन युवानेते श्रीनिवास पाटील यांनी केले.
ऐनापूर येथे नुकत्याच खुल्या कब्बड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. याचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी ऐनापूर गुरूदेवाश्रमाचे पपू श्री बसवेश्वर महास्वामीजी व अन्य मान्यवर व्यासपीठावर होते.
उद्घाटनानंतर श्रीनिवास पाटील म्हणाले, कब्बडीसह अन्य क्रीडा प्रकारांमध्ये ऐनापूरचे नाव पूर्वीपासूनच गाजलेले आहे. या ठिकाणी पुन्हा कब्बड्डी स्पर्धा होत आहेत, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी विविध क्रीडा प्रकार आत्मसात करणे आवश्यक आहे. एखाद्या क्रीडा प्रकारात तरुण निपूण आहे. परंतु, त्याला दिशा मिळत नसेल तर अशांनी आ. श्रीमंत पाटील फाऊंडेशनची जरूर मदत घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले. प.पू. बसवेश्वर महास्वामीजींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावात ज्येष्ठ नागरिक, ऐनापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, भाजपचे कार्यकर्ते कब्बड्डीपटू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta