बेळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगावात आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भव्य हिंदु एकता दिंडी यात्रा काढण्यात आली.
सोमवारी सायंकाळी बेळगावातील शहापूरातील बॅ. नाथ पै सर्कलपासून कपिलेश्वर मंदिरापर्यंत हिंदू राष्ट्र एकता दिंडी यात्रा काढण्यात आली. सजवलेल्या वाहनात सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा ठेवून भव्य दिंडी काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वेशात डोक्यावर कुंभ घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तर पुरुष मंडळी हातात भगवा ध्वज घेऊन उत्साहाने सहभागी झाले होते. वारकरी, राष्ट्रपुरुषांच्या वेशात लहान मुले सहभागी झाली. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी बोलताना हिंदू जनजागृती समितीचे ऋषिकेश गुर्जर दिंडीबाबत माहिती दिली. सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले यांनी १९७८ मध्ये भारतात २०२५ पर्यंत पुन्हा एकदा रामराज्य येईल असे भाकीत केले होते. त्यांचे शब्द खरे ठरतील असे वातावरण आता देशात आहे. आता राम मंदिराचे निर्माण होत आहे. त्यामुळे हिंदू धर्माबाबत जनजागृती करण्यासाठी हिंदू धर्माची शक्ती दाखवून देण्यासाठी या दिंडी यात्रेचे आयोजन केल्याचे गुर्जर यांनी सांगितले. डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त ही दिंडी काढल्याचे सांगून उज्वला गावडे म्हणाल्या, वारकरी संप्रदाय, कलावती आईंचे भक्त असे अनेक साधक, कलापथके यात सहभागी झाले आहेत. या दिंडी यात्रेत असंख्य नागरिक सहभागी झाले होते. शिस्तबद्धरित्या ही दिंडीयात्रा पार पडली.
Belgaum Varta Belgaum Varta