बेळगाव : बेळगावमध्ये प्रभाग पुनर्रचना करून मराठी भाषिकांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मराठीतून कागदपत्रे न देता कन्नडमधून देऊन गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी एकीच्या जोरावर आपण ही निवडणूक सक्षमपणे लढवूया, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
मंगळवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला दीपक दळवी यांच्यासह माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, अॅड. राजाभाऊ पाटील, रणजीत चव्हाण पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर बैठकीत आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना दीपक दळवी म्हणाले, काही प्रभागातील पंचानी एकच उमेदवार जाहीर करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. अशाच प्रकारचा निर्णय प्रत्येक प्रभागातून होणे आवश्यक आहे. एका प्रभागातून अनेक मराठी उमेदवार उभे राहिल्यास धोका अटळ आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात प्रभागवार निवड समिती नेमण्यात यावी. निवड समितीने घेतलेल्या उमेदवारा संदर्भातील निर्णयाला मध्यवर्तीची सहमती असेल. सर्वसहमतीने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जाहीर केले जातील. महापालिका निवडणुकीत पंचेचाळीसहून अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करुया. तरुणांनी या कामात पुढाकार घ्यावा. प्रत्येक वेळी महाराष्ट्रातून मराठी भाषिकांनी एकीची साद घातली जाते, याची जाणीव ठेवून महापालिकेच्या निवडणुकीत सीमाप्रश्नाची हानी होऊ नये याची सर्वांनीच काळजी घ्यावी. एकीच्या बळावरच विविध अडचणींवर मात करत निवडणुकीला सामोरे जाऊया असेही दळवी यांनी स्पष्ट केले आहे. एका विचित्र परिस्थितीत बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग पुनर्रचनेतून मराठी भाषिकांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कानडी भाषेत कागदपत्रे देत मराठी भाषिकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा वेळी एकीच्या जोरावर सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाऊ या, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …