बेळगाव : बेळगावमधील चन्नम्मा सर्कलमध्ये गुरुवारी सकाळी थरारक अपघात झाला, ज्यामुळे सर्वांच्याच काळजात धस्स झाले. ब्रेक फेल झाल्याने मालवाहू वाहनाने बसला धडक दिली परंतु सुदैवानेच प्रवासी बचावले.
बेळगावातील चन्नम्मा चौकात गुरुवारी सकाळी काळजात धडकी भरविणारा विचित्र अपघात झाला. एका मालवाहू वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने समोरील वाहनाला धडक दिली. त्यानंतर समोरील वाहनाने बसला धडक दिली. बसच्या डाव्या बाजूने मधोमध धडक बसूनही केवळ सुदैवानेच बसमधील प्रवासी बचावले.
सकाळची वेळ असल्याने चन्नम्मा चौकात वाहनांची मोठी वर्दळ होती. यावेळी मालवाहू वाहनाच्या चालकाला ट्रॅफिक पोलिसांनी वाहन बाजूला घेण्यास सांगितले. त्यानुसार तो वाहन बाजूला घेत असतानाच ब्रेक फेल झाले. त्यामुळे बाजूने जाणाऱ्या बसला मालवाहू वाहनांची धडक बसली. या अपघातामुळे चौकात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी क्रेन मागवून अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.