कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरूच आहेत. याच दरम्यान गुरूवारी (दि. २६) रोजी सकाळी कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. यामुळे गेल्या २४ तासात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि मोठा दारूगोळ्या, इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, ‘हे तिन्ही दहशतवादी एलईटी संघटनेशी संबंधित असून त्याना ठार करण्यात आले आहे. तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्यात आली असून ते पाकिस्तानीतील असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय त्याच्याकडील शस्त्रास्त्रे, मोठा दारूगोळ्या, इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ‘ तसेच या वर्षात आतापर्यंत २६ परदेशी दहशतवादी (१४ जैश आणि १२ एलईटी) उद्ध्वस्त करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कुपवाडा येथील जुमागुंड गावात दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली. याच दरम्यान दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार करण्यात सुरूवात केली. गोळीबाराला प्रत्युत्तर देताना तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अजूनही या भागात चकमक सुरू आहे.