Saturday , May 25 2024
Breaking News

विधान परिषद निवडणुकीत विजय भाजपचाच : नलीनकुमार कटील

Spread the love

बेळगाव : राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचाच विजय होईल, तसेच बेळगाव भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा विश्वास भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी व्यक्त केलाय.
वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार अर्ज भरण्यासाठी भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील बेळगावमध्ये आले होते. नलीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी मंत्री रमेश जारकीहोळी देखील सहभागी झाले होते. मंत्री गोविंद कारजोळ, उमेश कत्ती आदींसह अनेक नेते या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी मात्र अनुपस्थित होते. यापूर्वी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत पत्करावा लागलेल्या पराभवाविषयी विचारमंथन करून पुन्हा या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, या दोन्ही मतदार संघात भाजपाचाचेच उमेदवार विजयी व्हावेत यासाठी साऱ्यांनी एकसंघ होऊन काम करणे आवश्यक आहे, अशा सूचना नलीनकुमार कटील यांनी दिल्या.
पदवीधर, शिक्षक संघाच्या निवडणुकीप्रमाणेच धारवाड शिक्षक क्षेत्र, म्हैसूर येथे एका मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. या चारही ठिकाणी भाजप उमेदवारांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास नलीनकुमार कटील यांनी व्यक्त केला.
भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, हा एक राजकीय पक्ष असून राजकीय पक्ष म्हणजे एका घराप्रमाणे आहे. आणि घरातील अनेक सदस्यांमध्ये काही प्रमाणात मतभेद असतात. परंतु यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन विचारमंथन करणे, एकसंघ होऊन पुढे कार्य करणे आवश्यक असते. भाजपमध्ये सध्या कोणतेही मतभेद नसून सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवीत आहेत आणि याठिकाणी असलेल्या दोन्ही जागांवर भाजपचाच विजय होईल, असा विश्वास नलीन कुमार कटील यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांनी महांतेश कवटगीमठ यांच्या पराभवाचे कारण विचारताच कटील म्हणाले, काही फरकाने त्यांनी निवडणुकीत प्रभाव पत्करलाय. काही निवडणुकीत असे प्रकार घडतात. प्रत्येक निवडणुकीत आपणच विजयी होऊ असे काही नाही. काही वेळा असे प्रकार होऊ शकतात. परंतु गटबाजी आणि मतभेदामुळे हा पराभव झाला नसल्याचे कटील म्हणाले. आपल्या पक्षात काही नेत्यांमध्ये मतभेद आहेत मात्र हि बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. हि निवडणूक संपल्यानंतर आपण दोन बैठका घेणार असल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना कटील म्हणाले, चिंतन करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. मात्र त्यावेळी मतभेद असल्याचे निदर्शनास आले नव्हते. यासाठीदेखील एक सभा घेण्यात येणार असून यात सर्वांची बाजू समजून घेण्यात येणार असल्याचे कटील म्हणाले.
बेळगावमधील भाजप नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात नेत्यांच्या विविध प्रतिक्रियाही जनतेसमोर येत आहेत. मात्र प्रत्येक भाजपश्रेष्ठी हि बाब नाकारत असून भाजप मध्ये कोणतीही दुफळी नसल्याचे सांगत आहेत. याचप्रमाणे भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनीही भाजपमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठा सेवा संघातर्फे बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग

Spread the love  बेळगाव : मराठा सेवा संघ, बेळगाव यांच्यावतीने दररविवारी सकाळी १०.०० ते १२.०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *