वडगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
बेळगाव : तुरमुरी गावात 8 एप्रिल रोजी झालेल्या चोरी प्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
वडगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 एप्रिल रोजी तुरमुरी गावातील परशुराम केदारी भक्तीपर यांच्या घरात चोरी झाली होती. सदर प्रकरणी परशुराम भक्तिपर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार सदर चोरी प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता.
वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे मंडल पोलीस निरीक्षक श्रीनिवास हांडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 26 मे रोजी सकाळी हिंडलगा चेकपोस्टजवळ दोन दुचाकीसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून कसून चौकशी केली असता, त्यांनी तुरमुरी येथे झालेल्या चोरी प्रकरणाची कबुली दिली. त्यांच्याकडून 38 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी व अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. महेश भक्तीकर (वय 28 रा.तुरमुरी) व आकाश डोंगरे (वय 22 रा.मन्नुर) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी बजावली आहे.