बेळगाव : खडेबाजार शहापूर येथील गौड ब्राह्मण समाजाच्या पुरातन श्री गणेश आणि श्री मारुती ही दोन मंदिरे खुले करण्यासाठी, आज शनिवारी सायंकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सदर मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. सदर दोन्ही मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाकडून रास्ता रोको आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर रस्ता रोको आंदोलन संदर्भात माहिती देताना गौड सारस्वत ब्राह्मण मारुती मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष दिलीप तिळवे म्हणाले, शहापूर खडेबाजार येथील श्री मारुती आणि श्री गणेश मंदिर पाचशे वर्षांहूनही अधिक पुरातन आहे. त्या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी ट्रस्ट नेमण्यात आला आहे. प्रत्येक तीन वर्षांनी ट्रस्टची निवडणूक घेण्यात येत असते. मात्र 2016 सालापासून बैठक झालेली नाही. ट्रस्टींनी जमाखर्च दाखवलेला नाही. तीन वर्ष झाली दोन्ही मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावी या संदर्भात सातत्याने ट्रस्टींना विनंती केली जात आहे.
ट्रस्ट मंडळातील 11 जणांपैकी सात जणांनी राजीनामे दिले आहेत. मंदिरे खुली करून देण्याबाबत पोलीस प्रशासनाला बरोबरही चर्चा झाली आहे. आज शनिवारी मंदिर खुले केले जाईल असे कळविण्यात आले होते. मात्र सदर मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. त्यासाठीच रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे, असेही तिळवे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू होते. रास्ता रोको आंदोलनात गौड सारस्वत ब्राह्मण समाजासह, बजरंग दल, श्रीराम सेना कार्यकर्ते आणि परिसरातील भाविकांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी शहापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे वर्दळीच्या खडेबाजार शहापूर मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.