बेळगाव : बेळगावातील कन्नड साहित्य भवनातील महिला शौचालयात घुसुन रविवारी सकाळी एकाने चांगलाच गोंधळ घातला. त्याला बाहेर काढण्यासाठी भवनाचे कर्मचारी आणि पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.
आज सकाळी 7 च्या सुमारास भवनातील महिलांसाठी असलेल्या शौचालयात घुसून या बहाद्दराने आतून कडी लावली. काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नव्हता. भवनच्या कर्मचार्यांनी अखेर पोलिसांना बोलावले. मार्केट पोलीस आणि कर्मचार्यांनी त्या अज्ञाताला समजावून सांगत बाहेर येण्याची सूचना केली. त्यावर त्याने, पीएसआय येथे आले पाहिजे, मला संरक्षण दिले पाहिजे असे आतूनच सांगितले. त्यामुळे मार्केटचे पीएसआय विठ्ठल हावण्णावर यांनी घटनास्थळी येऊन त्याला बाहेर येण्याची सूचना केली. तरीही त्याने दाद दिली नाही. आपण कित्तूर तालुक्यातील खोदानपूरचा असल्याचे त्याने सांगितले. मात्र दार उघडून बाहेर आला नाही.
उलट शौचालयाची खिडकीची काच फोडली. त्यामुळे काही काळ विचित्र परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला, ‘तुला काही करणार नाही, तू बाहेर ये’ असे सांगत समजावले. त्यानंतर काही काळाने तो काचेचे तुकडे घेऊन बाहेर आला. त्यानंतर पोलीस त्याला मार्केट पोलीस स्थानकात घेऊन गेले आणि या विचित्र नाट्यावर पडदा पडला.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …