बेळगाव : कोनवाळ गल्लीतील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात नळाचे पाणी अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाबसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लहान मुले व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे हे पाणी पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी हानिकारक आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. तरी प्रशासनाने ही पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी आणि शुद्ध पाणी पुरावठा करावा, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील कोनवाळ गल्ली येथील पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते आहे.
