श्रीराम सेनेची आ. बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव : न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील लाऊडस्पीकर्स हटविण्याच्या मागणीसाठी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
मशिदींवरील लाऊडस्पीकर्स हटविण्याच्या मागणीसाठी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर्स हटवून ध्वनी प्रदूषण टाळावे आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी निदर्शक कार्यकर्त्यांनी केली. न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी श्रीराम सेनेने आंदोलन करूनही सरकार कार्यवाही करत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना श्रीराम सेनेचे नेते रवी कोकितकर म्हणाले, मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर्स हटविण्याचे आदेश 9 मे रोजी सरकारने दिले आहेत. त्याला महिना लोटला तरी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते या आदेशाला कवडीचीही किंमत देत नाहीय. स्थानिक आमदारांनी यात हस्तक्षेप करून मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर्स हटविण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात. अन्यथा पुढे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
निदर्शनात श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष विनय अंग्रोळी, विनोद होनगेकर, ओंकार गोडसे, सागर पाटील, किशोर शहापूरकर, पी. के. पाटील यांच्यासह श्रीराम सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
