शिक्षण संस्थांसह वैयक्तिक गाठीभेटींवर अधिक भर
अथणी (प्रतिनिधी) : माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून विधानपरिषदेच्या दोन्ही उमेदवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. शाळा, कॉलेजमध्ये बैठका घेऊन मतयाचनेबरोबरच त्यांनी मतदारांच्या वैयक्तीक भेटींवर देखील भर दिला आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघातील भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
आठवडाभरापासून आ. पाटील यांनी प्रचारासाठी कागवाड मतदार संघ पिंजून काढला आहे. ऐनापूर, उगार खुर्द, उगार बुद्रुक, शिरगुप्पी या भागातील प्रचारानंतर त्यांनी आपली प्रचाराची दिशा आता अन्य गावांमधील शाळा व कॉलेजकडेे वळवली आहे. नुकतीच त्यांनी कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाला भेट देऊन मतयाचना केली. यानंतर त्यांनी शेडबाळ येथील सन्मती विद्यालय व श्रमनरत्न श्री आचार्य सुबलसागर माध्यमिक शाळेला भेट दिली. पदवीधर मतदार संघाचे उमेदवार हणमंत निराणी व शिक्षक मतदार संघाचे अरुण शहापूर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
बुधवारी त्यांनी मदभावी येथील विविध शाळांना भेटी दिल्या. काही पदवीधर मतदारांचीही त्यांनी वैयक्तीक भेट घेऊन भाजपला पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील नागरिकांनी आ. श्रीमंत पाटील यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी चिकोडी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष विनायक बागडी, भाजपचे नेते महादेव कोरे, रेवण्णा पाटील, मुरगेप्पा मगदूम, डॉ. अनिल सरोडे, राम सोड्डी, पोपट जाधव, बसगोंडा पाटील, अब्दुल मुल्ला, आण्णासाब मिसाळ, निंगाप्पा मालगावे, ईश्वर कुंभारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते.
