पदवी अभ्यासक्रमाबाबत बेंगलोर येथे बैठक
बेंगळूर : पदवी शिक्षणासाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून यापुढील भाषा अभ्यासक्रमातही कौशल विकासावर अधिक भर असावा अशी सूचना कर्नाटक राज्य उच्च शिक्षण आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. थिम्मेगौडा यांनी केली. बेंगळूर येथे आयोगाच्या कार्यालयात बुधवारी पदवी अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्षाचा हिंदी अभ्यासक्रमाचा आराखडा ठरविण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या हिंदी अभ्यासक्रम समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
एनइपीनुसार पदवी अभ्यासक्रम तीनऐवजी चार वर्षाचा होणार असून चौथे वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर ‘ऑनर्स’ पदवी मिळेल व थेट पीएचडीसाठी प्रवेश मिळेल, अशी तरतूद केली असल्याने चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात संशोधन व प्रोजेक्टसाठी अधिक वाव असावा, असेही ते म्हणाले.
कर्नाटकाचा हिंदी अभ्यासक्रम देशात आदर्श ठरावा
कर्नाटकाचा पदवी हिंदी अभ्यासक्रम दर्जेदार व परिपूर्ण तसेच इतर राज्यांसाठी आदर्श ठरावा. अहिंदी राज्य असूनही आदर्श अभ्यासक्रम तयार केल्याचे नोंद राष्ट्रीय शिक्षण आयोगाने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्य पदवी हिंदी अभ्यासक्रम समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा मुदलियार व बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचे हिंदी अध्ययन मंडळाचे सदस्य तसेच राज्य समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र पोवार यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
कन्नडची सक्ती नाही
कर्नाटकाने पदवी एनइपी अभ्यासक्रमात एका सेमिस्टरसाठी कन्नड विषयाची सक्ती केली होती, पण उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही सक्ती रद्द करण्यात आल्याचे थिम्मेगौडा यांनी स्पष्ट केले. बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठासह काही विद्यापीठांनी सरकारचा आदेश डावलून एक ऐवजी दोन सेमिस्टरसाठी फंक्शनल कन्नडचा अभ्यासक्रम तयार केल्याचे तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतरही कन्नड विषयाची सक्ती करण्यात येत असल्याचे डॉ. प्रतिभा मुदलियार यांनी त्यांच्या निदर्शनास आणले असता ते म्हणाले की, हे चुकीचे असून असे करणे सरकारच्या आदेशाचे उल्लंघन व न्यायालयाचा अवमान ठरेल. याबाबत मी संबंधित विद्यापीठांच्या उपकुलगुरुंशी चर्चा करेन.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …