संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील खड्ड्यातून वाटचाल सुरू आहे. गावात २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या चरी (खड्डे) बुजविण्याचे काम तसेच ठेवून देण्यात आल्याने दुचाकी-चारचाकी वाहनधारकांची, ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली होती. संकेश्वरकरांना खड्ड्यातून ये-जा करावे लागत होते. संकेश्वर पालिकेने वेळोवेळी कांहीतरी सबब सांगून हे काम तसेच रखडत ठेवले होते. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, नंदू मुडशी तसेच सर्वच पालिका सदस्यांनी मंत्री उमेश कत्तीं,.माजी खासदार रमेश कत्ती यांची भेट घेऊन गावातील रस्ते पॅचवर्क रखडत राहिल्याचे निर्दशनास आणून दिले. मंत्रीमहोदयांनी पालिका अधिकाऱ्यांना संकेश्वरातील रस्ता पॅचवर्क काम ताबडतोब हाती घेण्याचा आदेश धाडला. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून गावात रस्ता पॅचवर्कचे काम जोमाने चाललेले दिसत आहे. पोस्ट रोड, मड्डी गल्ली, कमतनूर वेस, सुभाष रस्ता, आझाद रस्ता येथील रस्ता पॅचवर्क करण्यात आला आहे. गावातील उर्वरित रस्ता पॅचवर्कचे काम जोमाने चाललेले दिसत आहे. पालिकेने उशीरा का होईना गावातील रस्ते पॅचवर्कचे काम हाती घेत्याने संकेश्वरातील नागरिकांतून विशेष करुन वाहनधारक आणि ॲटोरिक्षा चालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
