Thursday , June 4 2026
Breaking News

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता व सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे घेत संबंधित शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचलवार यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गुरुवारी पहाटे विशेष सफाई पथकाने विविध सार्वजनिक ठिकाणांची पाहणी केली. यावेळी बेळगाव रेल्वे स्टेशन बसस्थानक परिसर, गोगटे सर्कल गार्डन परिसर, मिलिटरी महादेव मंदिरासमोरील नाल्याजवळील भाग तसेच कॅन्टोन्मेंट हद्दीतील अन्य काही ठिकाणी काही व्यक्ती व कुटुंबे तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास असल्याचे आढळून आले.

पाहणीदरम्यान काही बसथांब्यांमध्ये वैयक्तिक सामान ठेवण्यात आल्याने प्रवाशांच्या सोयीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच अन्नाचा कचरा, जुनी ब्लँकेट्स, रिकाम्या मद्याच्या बाटल्या आणि इतर अस्वच्छ वस्तूही आढळून आल्या. त्यामुळे परिसराची स्वच्छता राखणे कठीण होत असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे बोर्डाने नमूद केले आहे.

या परिस्थितीचा परिणाम तेथे वास्तव्यास असलेल्या महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः पावसाळा जवळ आल्याने या घटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्पष्ट केले की सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचा कोणताही हेतू नसून अनेकजण आर्थिक अडचणी, बेरोजगारी किंवा विस्थापनामुळे अशा परिस्थितीत राहत असू शकतात. त्यामुळे त्यांच्या सन्मानाचा आदर राखत मानवतावादी दृष्टीकोनातून प्रश्न हाताळण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय, बेळगाव महानगरपालिका, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि धर्मादाय संस्थांनी संयुक्तपणे परिस्थितीचे मूल्यांकन करून गरजू व्यक्तींना निवारा, पुनर्वसन व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“स्वच्छ शहर आणि संवेदनशील समाज हे एकमेकांचे पूरक आहेत. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वांसाठी सुलभ ठेवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, स्वच्छता राखावी, समस्या संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही कॅन्टोन्मेंट बोर्डाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदित्यराज कॅपिटल प्रा. लि.वर धाड; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

Spread the love  बेळगाव : ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपांवरून बेळगाव शहरातील भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *