Sunday , September 20 2026
Breaking News

आई आणि मुलाचा संकेश्वरजवळील हिरण्यकेशी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

संकेश्वर : आई आणि मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीत मंगळवार दि. 21 एप्रिल रोजी दुपारी घडली असून मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत सापडला नसून शोधकार्य सुरू आहे. याबाबत नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमाननगर येथील सौ. लक्ष्मी कुटोळी (वय 27 वर्ष) व त्यांचा मुलगा कु. सुप्रित कुटोळी (वय 10 वर्ष) हे दोघे मंगळवारी दुपारी शंकराचार्य मठाजवळ गेले होते. यावेळी सुप्रित नदीत पोहण्यासाठी उतरला असता प्रवाहाच्या जोरामुळे तो गटांगळ्या खात बुडू लागला. मुलाला वाचविण्यासाठी आई लक्ष्मी यांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली; मात्र दुर्दैवाने दोघेही नदीच्या पाण्यात बुडाले.

नदीत लक्ष्मी यांचा मृतदेह तरंगताना दिसताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. नदीकाठावर सुप्रितचे कपडे आढळून आल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आणि बुधवारी सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते; परंतु सुप्रितचा मृतदेह सापडला नाही.
लक्ष्मी कुटोळी यांच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधाकर कुटोळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणताही वाद किंवा भांडण नव्हते. लक्ष्मी यांना अलीकडे चक्कर येणे व डोके जड होण्याचा त्रास होत होता आणि त्यावर उपचार सुरू होते. “कामावरून फोनवर आरोग्याची विचारपूस केली असता ती बरी असल्याचे सांगितले. सायंकाळी नदीत मृतदेह आढळल्याचे कळताच मोठा धक्का बसला. पत्नीबरोबर मुलालाही गमावले,” असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिवशरण अवजी करत असून उद्या गुरुवार दि. 23 रोजी तिसऱ्या दिवशीही अग्निशामक दल व पोलिसांकडून सुप्रितच्या मृतदेहाचा शोध सुरू ठेवण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *