


संकेश्वर : काम आटोपून घरी निघालेल्या राहुल कुंभार या तरुणाला निलगार गणपती मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पाच पोलिसांनी लाठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित पाच पोलिसांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राहुल कुंभार हा काम संपवून कुंभार गल्लीतील आपल्या घरी जात असताना निलगार गणपतीच्या दर्शनासाठी असलेल्या रांगेतून जाण्याबाबत पोलिसांनी त्याला सूचना केली. आपण दर्शनासाठी नव्हे, तर घरी जात असल्याचे राहुलने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला लाठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मारहाणीत राहुलच्या अंगावर वळ उमटले असून त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.
दरम्यान, घटनेनंतर काही काळ निलगार गणपतीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. तरुणाला झालेल्या कथित अमानुष मारहाणीप्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta