Sunday , October 4 2026
Breaking News

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित सर्व हायस्कूल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव यांच्या वतीने संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांसाठी सर्व विषयांची विशेष कार्यशाळा ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील होते. प्रारंभी एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी माजी मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी सर्व संपन्न मूल्य व्यक्तींचा परिचय करून दिला. यानंतर सर्व संपन्नमूल्य व्यक्तींचे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव पी. पी. बेळगावकर, संचालक प्रा. सुरेश पाटील व संचालक श्री. बाळाराम पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना ‘माझी काटे मुंढरीची शाळा’ या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.

उद्घाटनपर भाषणात प्रा. विक्रम पाटील म्हणाले, “शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो. शिक्षकांनी मनात आणले तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, विचारांवर आणि भवितव्यावर शिक्षकांच्या कार्याचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची, सामाजिक जाणिवेची आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.”

यावेळी त्यांनी ‘माझी काटे मुंढरीची शाळा’ या पुस्तकाचा संदर्भ देत शिक्षकांच्या कार्यातील समर्पण, विद्यार्थ्यांशी असलेले नाते आणि शाळेच्या विकासासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत यांचे महत्त्व अधोरेखित केले. एका शिक्षकाच्या प्रयत्नांतून विद्यार्थ्यांच्या जीवनात आणि पर्यायाने समाजात कसा सकारात्मक बदल घडू शकतो, हे त्यांनी उदाहरणातून स्पष्ट केले. शिक्षकांनी आपल्या कार्यात नवनवीन प्रयोग, कल्पकता आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील यांनी शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक परिस्थितीशी जुळवून घेत सातत्याने स्वतःचे ज्ञान अध्ययावत ठेवण्याचे गरज व्यक्त केली. शिक्षकांचे योगदान हे केवळ शाळा पुरते मर्यादित नसून समाजाच्या जडणघडणीत ही त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेसाठी विविध विषयांचे रिसोर्स पर्सन यांनी आपापल्या विषयांच्या अध्यापन पद्धती, शिक्षकांची भूमिका, विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा आणि प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे शिक्षकांना अध्यापनातील नवीन दृष्टिकोन व उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. संस्थेच्या विविध शाळांमधील सर्व विषयांचे शिक्षक मोठ्या संख्येने कार्यशाळेस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित सावंत यांनी केले, तर पी. एच. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *