


बेळगाव : भारतनगर येथील युनियन बँकेसमोरील खुल्या जागेत मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या शोभेच्या विद्युत खांबांच्या तळाशी पुन्हा उघड्या विद्युतवाहिन्या दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी रयत गल्लीतील म्हशी या परिसरात चरण्यासाठी गेल्या असताना, शोभेच्या विद्युत खांबाच्या तळाशी असलेल्या उघड्या विद्युतभारित वायरचा स्पर्श होऊन तेजस मरवे या युवा शेतकऱ्याची सुमारे अडीच लाख रुपये किमतीची म्हैस जागीच दगावली होती. या घटनेचा पोलिस पंचनामा करण्यात आला होता.
घटनेनंतर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून खांबांच्या तळाशी असलेल्या वायर व्यवस्थित पट्ट्या गुंडाळून सुरक्षित केल्या होत्या. मात्र, आता पुन्हा त्याच खांबांच्या तळाशी विद्युतवाहिन्या उघड्या पडल्या आहेत. विशेष म्हणजे याच ठिकाणी भाडोत्री टेंपो उभे असतात आणि जनावरेही या परिसरात येत असतात.
उघड्या विद्युतवाहिन्यांचा चुकून एखाद्या नागरिकाला किंवा जनावराला स्पर्श झाल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या वायर सुरक्षितपणे बंदिस्त करून संभाव्य धोका दूर करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, मागील दुर्घटनेत म्हैस दगावूनही तेजस मरवे यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यात या ठिकाणी पुन्हा दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिका व संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta