


सलामवाडी येथील वळणावर वाहतुकीला अडथळा; खडी हटविण्याची नागरिकांची मागणी
दड्डी : शट्टीहळ्ळी–हत्तरगी मुख्य रस्त्यावरील सलामवाडी येथील वळणावर बांधकामासाठी टाकण्यात आलेली खडी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. मुख्य रस्त्याच्या वळणावरच खडीचा ढीग असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शट्टीहळ्ळी–हत्तरगी हा परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अशा परिस्थितीत वळणावरच खडी टाकण्यात आल्याने वाहनचालकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेताना चालकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
रात्रीच्या वेळी अपघाताची भीती
रात्रीच्या वेळी खडीचा ढीग वेळेत नजरेस न पडल्यास वाहनचालकांचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे
संबंधित ग्रामपंचायत आणि रस्ते बांधकाम विभागाने या ठिकाणाची पाहणी करून रस्त्यावरील खडी तातडीने हटवावी किंवा सुरक्षित ठिकाणी हलवावी. खडी हटविण्यापूर्वी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य सूचना फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हा संभाव्य धोका दूर करावा, अशी अपेक्षा वाहनधारक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta