Sunday , September 20 2026
Breaking News

पत्रकारितेच्या निष्ठेला मानवंदना, दिवंगत पत्रकार विठ्ठलराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन

Spread the love

 

संकेश्वर (प्रतिनिधी) : समाजातील अन्याय, समस्या आणि सामान्य जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या पत्रकारांचे कार्य हे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच महान आणि जबाबदारीपूर्ण आहे, असे गौरवोद्गार प्रकाश आवलक्की यांनी काढले.

येथील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत विठ्ठलराव बाळू पाटील यांच्या ७ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संकेश्वर येथील वातावरण आज भावनिक आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेले होते. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत विठ्ठलराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

प्राचार्य अवलक्की पुढे म्हणाले की, आज समाज अनेक ज्वलंत समस्यांना सामोरे जात आहे. अशा वेळी पत्रकार हे केवळ वृत्त देणारे नसून समाजाचे सजग प्रहरी म्हणून कार्य करीत आहेत. सीमाभागातील पत्रकार विशेषतः कन्नड आणि मराठी समाजामध्ये सांस्कृतिक आणि भाषिक सलोखा टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य करीत असून त्यांची भूमिका अत्यंत प्रेरणादायी आहे.

दिवंगत विठ्ठलराव पाटील यांनी औद्योगिक व्यवसाय सांभाळत पत्रकारितेत पाऊल ठेवले आणि तब्बल २५ वर्षे निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि समाजाभिमुख पत्रकारिता केली. त्यांच्या लेखणीने अनेक प्रश्नांना वाचा फोडली. अन्यायाविरोधात आवाज उठवत त्यांनी शासन आणि प्रशासनाला वेळोवेळी जागे करण्याचे कार्य केले. त्यांच्या पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी असलेली नाळ ही आजच्या युवा पत्रकारांसाठी आदर्शवत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी या भागातील पहिले वैमानिक भरामजी पाटील यांच्यासह स्थानिक पत्रकार, समाजसेवक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पत्रकार स्व. विठ्ठलराव पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र वृत्तपत्रकार नरेश व्ही. पाटील यांनी पुढील वर्षापासून संकेश्वर सीमाभागात समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

कार्यक्रमास डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. विनोद गायकवाड, डॉ. मंदार हावळ, संकेश्वर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संतोष मुडसी, सहकारी क्षेत्रातील नेते सुभाष कासरकर, समाजसेवक अप्पा मोरे, जयप्रकाश सावंत तसेच पत्रकार सुरेश मंजरगी, परेश भोसले, पांडुरंग पाटील, एम. के. मोमीन, सचिन कांबळे, सचिन सावंत, आनंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत पुष्पराज माने यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद शिंदे यांनी मानले

दिवंगत विठ्ठलराव पाटील यांची पत्रकारिता ही केवळ बातम्यांपुरती मर्यादित नव्हती; ती समाज परिवर्तनाची चळवळ होती. सीमाभागातील प्रश्न, सामान्य माणसाचे दुःख आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी आयुष्यभर लेखणी झिजवली. म्हणूनच त्यांचे कार्य आणि स्मृती आजही समाजमनात तितक्याच जिवंत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *