Sunday , September 20 2026
Breaking News

सलामवाडी ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांग नागरिकांसाठी विशेष

Spread the love

 

तपासणी व पुनर्वसन शिबिर; 50 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

दड्डी : जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), बेळगाव यांच्या वतीने सलामवाडी ग्रामपंचायत येथे गुरुवारी दिव्यांग नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय तपासणी व पुनर्वसन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला दिव्यांग नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 50 दिव्यांग लाभार्थ्यांनी विविध सेवांचा लाभ घेतला.

दिव्यांग व्यक्तींना आवश्यक वैद्यकीय तपासणी, दिव्यांगत्व प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन, पुनर्वसन सेवा तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात डॉ. स्वप्नाली रमाकांत पाटील, रवींद्र जी. डी. आणि प्राणेश नरसिंहराव यांनी विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. तसेच गरजेनुसार उपचार, समुपदेशन, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, कुबड्या व इतर सहाय्यक साधनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजना, आर्थिक सहाय्य व इतर सवलतींची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

हे शिबिर सलामवाडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. मोदगे, सलामवाडी आणि शट्टीहळळी परिसरातील पात्र दिव्यांग नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी करून घेतली. वैद्यकीय सेवा, पुनर्वसन मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना वेळ, खर्च आणि धावपळ वाचून आवश्यक सेवा सहज उपलब्ध झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडीओ) संतोष खब्बगोळ, महादेव बराटे, बसवंत सनदी, व्ही. आर. मनवाडे, बसाप्पा मांग, प्रवीण सावंत, प्रभाकर कळवीकट्टे, सतूराम कोलकार तसेच दिव्यांग नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *