Sunday , September 20 2026
Breaking News

सलामवाडीत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी अनुभवला पालखी सोहळा

Spread the love

 

घटप्रभा हायस्कूल, प्राथमिक शाळा व अंगणवाडीचा भक्तिमय उपक्रम

दड्डी : सलामवाडी (ता. हुक्केरी) येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने घटप्रभा हायस्कूल, प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली.

यावेळी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांच्या वेशभूषा परिधान करून आकर्षक दिंडी काढली. टाळ, मृदंग, वीणा आणि भगव्या पताका हातात घेऊन विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढली. “ज्ञानबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि समाजात एकता, सद्भावना व सेवाभाव यांचे महत्त्व समजावून सांगितले. अंगणवाडीतील चिमुकल्यांनीही उत्साहाने सहभाग घेत पालखी सोहळ्याची शोभा वाढवली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एन के गुरव, व्ही एम. हुद्दार, ए. के. पाटील, एम. बी. आजाणी, ए. जे. खांडेकर, ए पी पाटील, पी बी कोले, एस एम कांबळे,मारुती पाटील, सुरेश आस्वले, देवानंद सुतार, विठ्ठल आस्वले., मीनाक्षी गुरव, प्रदीप शेंडे, ललिता बडीगेर, रेखा बराटे, लता सुतार, अंकुश दावणे, हनमंत प्रधान, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची जपणूक होण्यास मदत झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *