Sunday , September 20 2026
Breaking News

डॉक्टरांच्या घरातील कोट्यवधींच्या दागिन्यांची चोरी उघड; केअरटेकर अटकेत

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील एका नामांकित डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून फरार झालेल्या केअरटेकरला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चोरीचा माल विक्रीसाठी मदत करणाऱ्या आणखी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल सतीश कांबळे (वय २७, मूळ रा. कागवाड) असे असून, चोरीचे सोने विक्रीसाठी मदत केल्याप्रकरणी बाबासाहेब कटगेरी (रा. कागवाड) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी डॉ. विश्वनाथ धडेद यांच्या घरात ही मोठी चोरी झाली होती. याबाबत त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा धडेद यांनी ११ मे रोजी तक्रार दाखल केली होती.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे डीसीपी निरंजनराजे अरस, खडेबाजार एसीपी शेखरप्पा आणि कॅम्प पोलीस निरीक्षक आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान घरातील ट्रेझरी अथवा कुलूप न तोडता अत्यंत चलाखीने तब्बल ९३० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याचे उघड झाले.

तपासात आरोपी राहुल कांबळे याने कागवाड येथील बाबासाहेब कटगेरी यांच्या माध्यमातून चोरीचे सोने विकण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ५२.५ लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोने तसेच खासगी वित्त संस्थेत गहाण ठेवून घेतलेल्या २२.८ लाख रुपयांच्या कर्जाशी संबंधित सोन्यासह एकूण ७३.३ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

उर्वरित चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास कॅम्प पोलीस करीत आहेत, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *