बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनींवर होणार्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बेळगाव जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. विद्यार्थिनीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणार्या शिक्षकाला गावकर्यांनी चोप दिल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील यकुंडी गावात उघडकीस आलीय.
यकुंडी गावातील हायस्कूलचा शिक्षक महेश शिवलिंगप्पा बिरादार याच्यावर आठवीपासून विद्यार्थिनीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनी आठवी इयत्तेत असताना तिचे लैंगिक शोषण झाले. विद्यार्थिनी दहावीत जाईपर्यंत हे सुरूच होते. शिक्षकानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतानाच्या प्रसंगांचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. आता दहावीनंतर कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर या युवतीचं दुसर्या युवकाशी लग्न ठरलं. ते लग्न मोडण्यासाठीचं महेश बिरादारने व्हिडिओ एडिट करून आपला चेहरा काढून विद्यार्थिनीचे अश्लील फोटो आपल्या वॉट्सअप स्टेट्सवर ठेवले. हे फोटो व्हायरल होताच ग्रामस्थांनी संतापून शाळेत येऊन महेश बिरादारला चांगलाच चोप दिलाय.
शिक्षकाची ग्रामस्थांनी धुलाई करतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. शिक्षक मूळचा विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील बैरवाड गावचा रहिवासी आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात सौंदत्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. दुर्भावनापूर्ण पद्धतीनं तरुणीचं लग्न मोडण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप शिक्षकावर आहे.
