बेळगाव : शहरातील इन्नरव्हील क्लबच्या वतीने कॅम्पमधील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांना पर्यावरणाचे महत्व समजावे, त्याचबरोबर परिसरातील प्राणी, पक्षी यांचे मानवी जीवनात असणारे स्थान लक्षात यावे व त्यांचे संवर्धन करण्यासाठी लहानपणापासून जागरूकता निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर येथील ’चिमणी वाचवा’ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या अमृता ओतारी यांनी चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा यावर मुलांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ’चिमणी वाचवा’या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी शाळेच्या प्रगतीस सहकार्य म्हणून क्लबच्या वतीने श्रीमती लता कित्तुर यांच्या हस्ते शाळेला एक टीव्ही भेट देण्यात आला.
शाळेच्या विद्यार्थ्यांनींनी स्वागतगीत, ईशस्तवन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी यांनी स्वागत केले तर व्यासपीठावर सचिव डॉ. सविता कद्दु, माजी जिल्हा अध्यक्षा लता कित्तुर, माजी अध्यक्षा कीर्ती टेंबे, इव्हेंट चेअरमन शिल्पा मदली, रश्मी अंगडी, उपसचिव पुष्पांजली मूकन्नावर, सपना काजगार, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षा सुषमा शेट्टी यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले व यापुढेही सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पंडित यांनी केले तर आभार सविता कद्दु मानले.
