बेळगाव : गटारात पडून एका दुचाकी वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. माधवपूर वडगाव येथील दत्तगल्ली येथे दत्त मंदिर जवळ आज सकाळी ही घटना घडली आहे.
हा युवक हा वडगाव चावडी गल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तो युवक अविवाहित असून त्याच्या तीन बहिणीचा विवाह झाल्याचे सांगण्यात येते. तो यंत्रमाग व्यावसायिक होता, असे समजते.
त्याची दुचाकी गटारीनजीक आडवी पडली असून त्या युवकाचा पाय दुचाकीत अडकला आहे तर त्याचा डोकीपासूनच कमरेपर्यंतचा भाग गटारीत तर कमरेपासून वरील भाग गटारीबाहेर आहे.
पडल्यानंतर त्याचे डोके नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीच्या वरील कोनावर आढळल्याने गंभीर दुखापत होऊन त्या युवकाचा मृत्यू झाला असल्याचे दिसते.
त्याच्या कान आणि मानेच्या मध्ये मोबाईल आहे. तर त्या दुचाकीचे स्टँड लावलेले आहे. हे पाहता कोणाचातरी फोन आल्याने गाडी गटारीनजीक उभी करून तो कानाला मोबाईल लावून बोलताना त्याचा तोल गेला असावा आणि नजिकच्या गटारीत पडल्याने डोकीला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असा कयास आहे.
घटनेनंतर तब्बल दोन तासाहून अधिक वेळ तो युवक गटारीत पडून होता. घटना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्या युवकाच्या आई-वडिलांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
मोबाईलमुळेच त्या युवकाचा घात झाला. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा, असे सांगण्यात येते. तरीही आज महाविद्यालयीन युवकच नव्हे तर अनेक मोबाईलधारक वाहन चालविताना कानाला मोबाईल लावून बोलत वाहन चालविताना दिसतात. आजची घटना पाहता, मोबाईलधारकांनी हा प्रकार थांबवला पाहिजे, असे सांगावेसे वाटते.
Belgaum Varta Belgaum Varta