बेळगाव : येत्या सोमवार दिनांक 19 व गुरुवार दिनांक 22 जुलै 2021 रोजी होणाऱ्या इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी म्हणून बेळगाव तालुक्यातील सर्व पी.ई. शिक्षक व स्काऊट अँड गाईड शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी मच्छे येथील डिवाइन मर्सी स्कूलमध्ये गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर. पी. ज्युट्नावर हे होते. या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बेळगाव तालुक्याचे शारीरिक शिक्षणाधिकारी एस. बी. हंचनाळ, डिवाइन मर्सी स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनीता, बेळगाव तालुक्याचे बी.आर.सी. मेदार, कर्नाटक राज्य शारीरिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बरगाली, विनोदी मॅडम, उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत विनोदी मॅडम यांनी केले. यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी आर. पी. ज्युट्नावर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, तालुक्यातील सर्व शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षक व स्काऊट अँड गाईड शिक्षकांनी गतवर्षी जशी दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले तसेच यावर्षी देखील ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दिलेली कामे योग्य प्रकारे हाताळून पार पाडावी. यावेळी माहिती देताना ते म्हणाले, मुख्य परीक्षा केंद्रातील प्रत्येक ब्लॉकमध्ये बारा विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी, एका बेंचला एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी, दोन बेंचमधील अंतर कमीत कमी सहा फूट असावे, ब्लॉक मोठा असेल तर बारा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी, प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्रात एक तरी एक्स्ट्रा ब्लॉक असावा, प्रत्येक परीक्षा केंद्रात एस.ओ.पी.चे सक्तीने पालन करावे, प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही सक्तीचे नाही, परीक्षा केंद्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वॅक्सिन घेणे सक्तीचे आहे, परीक्षा दोन दिवस आहे पहिल्या दिवशी कोर्स सब्जेक्ट दुसऱ्या दिवशी भाषा परीक्षा घेतली जाणार आहे, परीक्षेचा कालावधी तीन तासाचा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनर करावे, प्रत्येक विद्यार्थ्याने मास लावलाच पाहिजेत, सामाजिक अंतर ठेवले पाहिजेत, सॅनिटायझरचा उपयोग केल्या पाहिजेत, येताना विद्यार्थ्यांनी पाण्याची बॉटल स्वतंत्रपणे आणावी, अशा अनेक सूचना या बैठकीमध्ये ज्युट्नावर यानी केल्या. शेवटी मादार यांनी आभार मानले.