बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील मराठी नागरिकांना त्यांच्या भाषेत कागदपत्रे व इतर साहित्य मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारने 31 मार्च 2004 रोजी परिपत्रकही काढले आहे. परंतु काही कन्नड संघटनांच्या विरोधामुळे हे परिपत्रक मागे घेतले आहे. परिपत्रकात काही दुरुस्ती करण्याचे कारण देऊन मागे घेतलेले हे परिपत्रक अजून प्रसिद्धीस दिले नाही. त्यामुळे मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. सरकारकडे व प्रशासनाकडे याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही सरकार दुर्लक्ष करीत आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेशही सरकार मानीत नाही याबाबत दि. 1 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन म. ए. समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निवेदनही दिले आहे. या निवेदनाचा सुद्धा विचार न केल्यामुळे दिनांक 27 जून रोजी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने प्रचंड मोर्चा आयोजित करीत असून ठरलेल्या वेळी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल, अशा प्रकारची माहिती आज बेळगावचे पोलीस कमिशनर श्री. बोरलिंगय्या यांना देण्यात आली.
आपण बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घ्या व त्यांना माहिती द्या म्हणजे जिल्हाधिकारी व मी आपल्याशी संयुक्त बैठकीत चर्चा करू, असे श्री. बोरलिंगय्या म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती देण्यात आली. शिष्टमंडळात अध्यक्ष श्री. दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी यांच्या समावेश होतो. या चर्चेच्या वेळी असिस्टंट पोलीस कमिशनर श्री. नारायण बरमनी व श्री. चंद्रप्पा हे हजर होते.
