Sunday , October 27 2024
Breaking News

मध्यवर्तीकडे धावा, ओळखा अनाजीपंताचा कावा!

Spread the love

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात “काय घडतय आणि काय बिघडतय” याची चाचपणी मध्यवर्ती करेल का? असा प्रश्न बेळगावच्या राजकारणात उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वत्रच इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अनेक तर गुडघ्याला बाशिंग बांधून मीच ग्रामीणचा उमेदवार अश्या थाटात वावरताना दिसत आहेत. सध्या आयाराम तेजीत आहेत तर निष्ठावान संभ्रमात असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
समितीचा मागील 10 ते 15 वर्षांचा इतिहास पाहता स्वतःला परिस्थितीनुरूप समितिनिष्ठ समजणारे किंबहुना फक्त उमेदवारीसाठीच कोणत्याही संघटनेशी किंवा पक्षाशी बांधील असणारे बंडखोर संधीसाधू असोत किंवा पेपरसम्राट यांनी स्वतःच्या महत्वकांक्षेपोटी ग्रामीणमधील हक्काची समितीची जागा दिवसेंदिवस शिथिल करून राष्ट्रीय पक्षाचे मूळ ग्रामीण भागात रुजविण्याचे काम केले आहे. या पेपर सम्राटांच्या बोटी समुद्रात तरंगत आहेत, त्या फायद्यात राहाव्यात म्हणून त्यांना केंद्रात सत्तास्थानी असणाऱ्या भाजपशी जुळवून घ्यावे लागत आहे. त्यांना गोव्यातील राजकारण करण्यासाठी व आपल्या सोसायटीची अनियमितता झालेले गैरव्यवहार लपवण्यासाठी भाजपशी जुळवून घ्यावे लागते. पेपर सम्राट गोव्याच्या मोदींच्या सभेत ज्या पद्धतीने उसळून उसळून टाळ्या वाजवत होते, त्याअर्थी सीमावर्ती भागात त्यांना कोणता विडा दिला असेल हे प्रत्येक सीमावर्ती जाणतो. मागील विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदारसंघात बंडखोरी केलेला त्यांचा उमेदवार केविलवाणीपणाने हजार मताचा टप्पाही गाठू शकला नव्हता. त्यांच्या भाजपा प्रेमाची दखल ग्रामीण जनतेने घेतल्यामुळे त्यांनी नवीन डाव खेळत, एकीची हाकाटी उठवायला लावली आहे. समितीच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर यांचे मधुर संबंध आहेत. समिती विरुद्ध यांनी घेतलेल्या सुपाऱ्या सीमाभागातील जनतेला ज्ञात आहेत, यांच्याशी निष्ठावान असणाऱ्या लोकांचे लागेबांधे कोणाशी आहेत हेही लोकांना माहित आहे. यांच्या बगलबच्यांनी राष्ट्रीय पक्षांशी घरोबा केला होता, आता राष्ट्रीय पक्षाशी काडीमोड घेऊन परत एकदा समितीचा झेंडा हातात घेऊन मी किती निष्ठावान हे दाखविण्याचा यांचा प्रयत्न म्हणजे, “सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को” असे म्हंटल्यासारखेच आहे. आज बेळगाव ग्रामीणमध्ये मीच आमदारकीचा दावेदार असे म्हणत गावोगावी सभा बैठका घेत फिरणाऱ्या संधीसाधुला समितीप्रेमी जनता स्वीकारेल का? असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. जे महाभाग फक्त पदे भूषविण्यासाठीच समितीशी सलग्न असतात अश्या स्वार्थी संधीसाधूंना तालुका समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी खड्यासारखे बाजूला करणे अपेक्षित आहे. सत्तेच्या लालसेपोटी राष्ट्रीय पक्षात गेलेले “अनाजीपंत” आजही पदाच्या अपेक्षेनेच समितीकडे परतलेत हे विसरून चालणार नाही. आजवर समिती निष्टावंतांच्या निष्ठेवर टिकली आहे. जनतेने पेपर सम्राटाला व त्यांच्या प्याद्याना नाकारलेले आहे. म्हणून समितीमधील ज्येष्ठ नेत्यांनी या आगंतुकांचा हेतू ओळखून त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली पाहिजे नाहीतर पेपर सम्राटाच्या दावणीला बांधलेले हे “अनाजीपंत” पुन्हा एकदा बंडखोरी करतील आणि आख्खी समितीच पेपर सम्राटाच्या दावणीला नेऊन बांधतील यात शंकाच नाही. या अनाजीपंताना मनसबदाऱ्या व मासिक खुराक सोसायटीतून मिळत आहे. त्या बळावर ते बेफाम झाले आहेत. एक जूनला त्यातील काही जणांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना, राष्ट्रपती राजवट व केंद्रशासीतची शिकवलेली पोपटपंची करताना, कायद्याच्या कलमांचा “कलमा” पढत आपण पेपर सम्राटाचे ‘पाईक’ असल्याचे सिद्ध केले आहे. ज्या पेपर सम्राटाने समितीच्या गळ्यालाच नख लावण्याचा अनेकदा प्रयत्न केला त्या पेपर सम्राटाची निष्ठाच भाजपाला वाहिलेली आहे, त्याचे प्यादे कसे समितीशी प्रामाणिक राहणार? असा सवाल ग्रामीण व समितीनिष्ठ जनता करत आहे. मुळात ग्रामीणच्या जनतेचा कानोसा घेतला तर, मध्यवर्तीशी एकनिष्ठ असा त्यांना नवीन चेहरा हवा आहे. तो ही समितीनिष्ठ !!

क्रमशः

About Belgaum Varta

Check Also

कोणत्याही परिस्थितीत काळ्या दिनाची सायकल फेरी काढणारच; पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती नेत्यांचा निर्धार

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण यापूर्वीही आला होता. त्यावेळीही काळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *