बेळगाव : गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील आरटीओ चेक पोस्टवर करात सवलत द्यावी, या मागणीसाठी बेळगावात शनिवारी वाहनचालकांनी जोरदार निदर्शने केली.
सीमेवरील आरटीओ चेक पोस्टवर करत सवलत देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक वाहनचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगावातील चन्नम्मा चौकात शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शक वाहनचालकांनी आपल्या मागण्याच्या पूर्ततेसाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. बेळगाव सीमाभागात असल्याने गोवा आणि महाराष्ट्रात जाणार्या वाहनचालकांना वाणिज्य कर भरताना दरवेळी मोठा त्रास सहन करावा लागतो. बेळगावपासून जवळ असल्याने धार्मिक स्थळांना, समुद्रकिनारी जाण्यासाठी जिल्ह्यातील लोक टॅक्सी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे टॅक्सी चालकांना कर्नाटकाचाही कर भरावा लागतो अन महाराष्ट्र व गोवा सरकारचाही कर भरावा लागतो. 3-3 ठिकाणी कर भरण्याचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे सरकारने याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निदर्शक वाहनचालकांनी यावेळी केली.
अरुण मेळवंकी, दीपक कांबळे, जोतिबा कुंभार, शिवू हल्ल्याळ आदींनी या निदर्शनात भाग घेतला.
